Ad will apear here
Next
केक का बिघडतो?
आजकाल दुकानात केकचे अनेक प्रकार असतात. आपण गोंधळून जाऊ इतकी सुंदर सजावट असते. वेगवेगळे आकर्षक साहित्य, चव, एखादी थीम डोळ्यांपुढे ठेवूनही केकची ऑर्डर दिलेली असते, पण या सगळ्यांत कौतुक वाटते, ते घरी केक बनवणाऱ्या गृहिणींचे.  मागील लेखात आपण केकसाठी लागणाऱ्या साहित्याचे महत्त्व आणि कार्य तसेच त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या प्रमाणाचे महत्त्व पाहिले. पदार्थ बनवण्याची आवड व स्वतः केलेले पदार्थ इतरांना प्रेमाने खाऊ घालण्याचा छंद अनेक स्त्रियांना असतो. ‘पोषणमंत्र’ सदरातील आजचा हा लेख अशा सर्व उत्साही महिलांसाठी...
...................
कोणताही आनंद व्यक्त करण्यासाठीचे प्रतीक म्हणून आजकाल ‘केक’कडे पाहिले जाते. पूर्वी केक हा वाढदिवसाचा अविभाज्य भाग असायचा, आता मात्र कशाचेही सेलिब्रेशन म्हटले की केक पाहिजेच. घरी केक बनवताना आपण घरातील सगळ्यांची आधीच एक मानसिक तयारी करून ठेवतो, जसा झाला असेल तसा खावा लागेल वगैरे.. आणि घरचेही मोठ्या उत्साहाने तयार होतात.  कारण केक न आवडणारी व्यक्ती मिळणे विरळच. केक बनवताना त्याची चव, रंग, स्वाद आतून कच्चा नाही ना.., वरून जळाला तर नाही ना, किंवा खूप गडद रंग तर नाही आला? अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चव उत्तम तर वरून भेगा पडलेल्या असतात. रंग छान असला तरी आतून कच्चा राहतो, तर कधी अंड्याची चव जास्त लागते, अशा होणाऱ्या गडबडींमुळे पुढचा केक आता छान बनवायचा, असे ठरवले जाते. परंतु यात काहीजणींचा उत्साह कमी होण्याची शक्यता असते. त्यांचा हा उत्साह टिकवून ठेवण्यासाठीही या लेखाची मदत होईल.

केकमध्ये मुळातच एक-दोन नव्हे तर कमीत कमी पाच प्रकारचे साहित्य लागते. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे. एकत्र आल्यावर त्यामध्ये होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया ही सगळी गुंतागुंत तशी सोपी नाही. त्यामुळे केक बनवताना नेमके काय चुकते, ते कळले तर आपण त्या टाळू शकतो. अनेक कारणांनी केकमध्ये गडबड होऊ शकते. ती कारणे काही अशी...  
- साहित्याचे प्रमाण चुकणे
- साहित्याचा दर्जा योग्य नसणे
- फेटणे, चाळणे, यांसारख्या क्रिया आवश्यकतेनुसार न होणे
- बेकिंग करण्यापूर्वी किंवा करतेवेळी वेळ व तपमान कमी-जास्त होणे

हे मुद्दे लक्षात ठेवावेत : 
स्निग्ध पदार्थ म्हणजे लोणी किंवा साखरेचा किंवा बेकिंग पावडरचा वापर जास्त झाल्यास केक भरपूर फुलतो व नंतर मध्ये बसतो. त्यामुळे तो इंग्रजी एम (M) आकाराचा दिसतो म्हणून त्याला ‘एम फॉल्ट’ म्हणतात. स्निग्ध पदार्थ जास्त असल्यास वरचा भाग तुपकट व जाडसर दिसतो. दुध, अंडी यांसारख्या पातळ पदार्थांचा जास्त वापर झाल्यास केक चारही बाजूने वर व मध्ये खाली म्हणजेच इंग्रजी एक्स (X) आकाराचा बसतो. जोपर्यंत केक ओव्हनमध्ये असतो, तोपर्यंत या पातळ पदार्थांच्या वाफेमुळे फुगलेला दिसतो, पण जसा थंड होतो, तसा तो बसतो.

तापमानातील चुकीचाही केकवर खूप परिणाम होतो. अनेकवेळा ओव्हन ठराविक तपमानापर्यंत गरम करून घ्या, असे सांगितले असतानासुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या तपमानाबरोबरच  केकच्या मिश्रणाचे तपमानसुद्धा महत्त्वाचे असते. फ्रीजमधील अंडी, दुध, तसेच इतर थंड पदार्थ वापरले, तर केक फुगत नाही व मुलायम न होता जरा कडक होतो. बेकिंग पावडर, मैदा किंवा इतर सुके साहित्य तीन वेळा चाळून घ्यायचे असते, पण आम्ही कंटाळा करतो. तीन वेळा चाळल्याने साहित्य एकमेकांत नीट मिसळले जाते व त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात.
 
खूप फेटले की केक छान होतो, हा एक गैरसमज आहे. साखर व तूप किंवा लोणी हे एकत्र क्रिमी होईपर्यंतच फेटावे. ते गरजेपेक्षा जास्त फेटल्यास केक बसतो. तसेच मिश्रण तयार करताना साखर किंवा अंडी हे एका वेळेस थोडे थोडे टाकत जावे, अन्यथा मिश्रण फाटल्यागत होते व केक तयार झाल्यानंतर आकाराने लहान व आतून एकसारखी रचना नसलेला होतो. दुधाचा वापर शेवटी करावा, अन्यथा केकच्या पोटात रेघोट्या तयार होतात. ताजी फळे घालायची असल्यास बारीक कापून प्रथम त्याला मैद्यात घोळवून घ्यावे आणि मग मिश्रण एकत्र करावे. अन्यथा मिश्रण पातळ होत जाऊन केक गच्च झाल्यासारखा वाटतो.

ओव्हनमध्ये केक भाजताना खूप कमी तपमान असेल, तर फिका रंग येतो, केक मुलायम न होता कोरडा होतो. तपमान खूप जास्त असल्यास वरचे आवरण जाड, कडक व रंग गडद होतो. केकमध्ये उंचवटा तयार होतो. हे सर्व दोष केक बनल्यानंतर लक्षात येतात. त्याची कारणे व परिणाम पाहिल्यास आपल्या लक्षात आले असेल, की हे दोष आकारमान, पोत, रंग, किरकोळ दोष अशी वर्गवारी केली जाते. 

छोट्या छोट्या गोष्टी केकवर कसा परिणाम करतात हे आपल्या लक्षात आले असेल. खरेतर हे एक शास्त्रच आहे. अनेक रासायनिक प्रक्रिया होतात, त्यावर उष्णतेचा परिणाम होतो.  योग्य साहित्याची निवड, हाताळण्याची योग्य पद्धती, नाजूकपणे एकत्र केलेले मिश्रण, योग्य तपमान या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्यामुळे यामधील विज्ञान समजून घेऊन केक बनवला, तर चुका किंवा दोष निर्माण होणार नाहीत. 

- आश्लेषा भागवत
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZNNBK
Similar Posts
केक बनवताना... घरी केक बनवताना, प्रत्येक वेळी तो चांगलाच होईल असे नाही. कधी आतून कच्चा, तर कधी वरून भेगा पडलेला, कधी उंचवटा येणार तर कधी मधला भाग खाली बसणार असे विविध दोष आढळून येतात. ते होऊ नयेत व आपला केक सुंदर व्हावा, त्याचा सुगंध, चव, दिसणे सगळेच उत्तम असावे, असे वाटत असल्यास आपण जे साहित्य वापरतो, त्याचे केक बनविताना
ब्रेकफास्टला नको ब्रेक दिवसभराच्या खाण्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे नाश्ता. अनेक जण वेळ नसल्याच्या नावाखाली तो टाळतात. मुख्यतः सकाळी लवकर घर सोडणाऱ्या स्त्रिया, तसेच आवडीचे पदार्थ नाहीत म्हणून शाळकरी विद्यार्थी नाश्त्याचा डबा तसाच परत आणतात. कंपनीत नाश्ता मिळतो म्हणून आयटीमधील अनेक तरुण घरचा नाश्ता न घेता बाहेरच्या पदार्थांना
या बियांमध्ये दडलंय काय? काही भाज्या व फळे जसे वांगी, दुधी भोपळा, पेरू यांच्या बियाही आपण सरसकट खातो, पण लाल भोपळा, टरबूज, कलिंगड, संत्र, लिंबू यातील बिया मात्र फेकल्याच जातात. खरे तर इथेच आपण मोठी चूक करतो.... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या फळे आणि भाज्या यांमधील बियांचे महत्त्व...
संकल्पना नैसर्गिक आहाराची... आजकाल शाळांमध्ये अगदी छोट्या मुलांना ‘अग्नीशिवाय स्वयंपाक’ अशी एक संकल्पना सांगितली जाते. यामुळे मुले अतिशय आनंदाने वेगवेगळे पदार्थ बनवतात व त्याचा आनंदही घेतात. तसेच काहीतरी आपण मोठेही करू शकतो. आठवड्यातून एक दिवस फक्त नैसर्गिक अन्नपदार्थच खायचे... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या महत्त्वपूर्ण नैसर्गिक आहाराबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language